कुठले पुस्तक कुठला लेखक


कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागून पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागतां
दाटून येते मनामधे भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसतां हसतां
उभी इथे मी पसरुन बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता

— शांता शेळके

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.