संवाद – संतोष आणी अमॄता, तु जातीयेस तर जा ..


जातीयेस तर जा
पण मी मात्र हालणार नाही या झाडापासुन..
वाळलेलं म्हणत असेन जग त्याला
पण माझ्यासाठी अजुनसुद्धा हिरवगांर आहे ते..
याच्या वाळक्या फांद्यांतुन जेव्हां आभाळ बघतो ना..
तेव्हां वाटत,
तडे झाडाला नाहीत वर ढगाला पडलेत ..
हे तडे बुजवायचे आहेत मला
माझ्या कवितांनी ..
तु जातीयेस तर जा, मी नाही आडवणार ..
पण दुःख होइल ईतकचं
एक तडा खोल माझ्याही काळजात पडेल..
फक्त तो बुजवायला तु नसशील
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

——————————-
चल लवकर निघुयात, ऊशीर होइल फार
तिकडे जग वाट बघतंय आपली
कविता वगैरे पुरे आता
थोडं सत्यात जगुन बघ..
अरे वाळलेलंच झाड ते.. मरेन आज ना उद्या
त्यासाठी तु का स्वतःला जाळुन घेतोस ?
चल उठ निघुयात .. ऊशीर होईल
अरे, बाहेर जग वाट बघतयं आपली..
बाकी नशीब म्हणायचं, एक तुझं आणी दुसर त्या झाडाचं..

अमॄता__

————————-
तु जातीयेस तर जा !!
मला गारवा जाणवतोय हवेत,
पावसाची चिन्हे असावीत
एक काळा ढग आकार घेतोय वर आभाळात
तडे बुजतीलच आता ..
नुसत झाड नाही ते.. एक संकेतस्थळ आहे
तुझं आणी माझ्या कवितांच..
पण.. तु जातीयेस तर जा
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

———————
मी निघुन गेले, झाडाला आणी त्याला तिथेच सोडुन..
परतीच्या वाटेत एक वीज तेवढी चमकलेली आठवते..
आणी बरसलेला मंत्रमुग्ध पाऊस..
पण मी परत नाहीच वळाले
काही दिवस तसाच मुसळधार पाउस पडत राहिला
त्यानंतर एकदा मी गेले होते त्या झाडापाशी
आता बहरलंय ते..
पण एक अवजड समाधी आहे जवळ..
कुणाची ते काहीच कळालं नाही..
पहिले तर नव्हती ?
त्या झाडाची फुलं त्याच समाधीवर पडत असतात ..

पण तो कुठेच दिसला नाही ..

अमॄता__

————————–
मी तिथेच होतो,
समाधीतुन एक आर्त आवाज पण दिला होता..
तुला वाटलं फांद्याच हालल्या झाडाच्या..
आणी तु मात्र पुन्हा निघुन गेलीस..
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

——————-