असले काही नसते


नजर, इशारा, स्पर्श, शहारा असले काही नसते
शब्दच्छल आहे हा सारा…असले काही नसते

पाणी असते पाणी केवळ, वाळू असते वाळू
अधिऱ्या लाटा, मुग्ध किनारा असले काही नसते

रात्र ज्या स्थळी कुशीत घेते ती जागा हक्काची
हीच ओसरी, तोच निवारा असले काही नसते

जाळणाऱ्याला जाळण्यासाठी सतत लागते ऊर्जा
अस्तनीस भोवतो निखारा… असले काही नसते

डोळ्यांनो हे मान्य करा की सत्य पाहवत नाही
खरा चेहरा खोटा पारा असले काही नसते

नशीब म्हणजे परमेश्वराची गोंडस दुसरी बाजू
काळ सुदैवी, काज बिचारा असले काहीH नसते

रुतणाऱ्या काट्यांचे असते अप्रूप ज्या फुलण्याला
त्याच्यासाठी सुगंध,वारा असले काही नसते

जन्मठेप सरल्यावर पक्षी उडू पाहतो तेव्हा
हळहळून म्हणतोच पहारा…’असले काही नसते’

  • मी…वगैरे, वैभव जोशी

मौन वाहे


अरुपास येते । अरुपाची सय
कातडीचे वय । गौण आहे

नीरवाच्या ओठी । नीरवता साजे
माझ्यातून तुझे । मौन वाहे

चारोळ्या


टाकतो पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी; देव म्हणतो, आज भलते मागण्याचा बेत आहे..! – अभिजीत दाते

माणसातला देव पुरेसा होता , का दगडांचे परवरदिगार झाले ? – अभिजीत दाते

जन्म-मृत्यूचे हजारो दाखले पाहून झाले
जीव जातो,वंश जातो,जात जाता जात नाही
वैभव जोशी

भिजकी वही


Courtsey – B G Limaye

ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणा-या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो

  • अरुण कोलटकर

  • Image courtesy – B G Limaye

जात जाता जात नाही


जन्म-मृत्यूचे हजारो दाखले पाहून झाले
जीव जातो,वंश जातो,जात जाता जात नाही

कधी संपेल हा खटला


कधी संपेल हा खटला , कसे काही घडत नाही
परागंदाच कविता अन् कवीही सापडत नाही

किती असते जरी कोणी , कुणी नसतेच कोणाचे
मरण पाहून दर्याचे किनाराही रडत नाही
Continue reading