धर्मवीर संभाजीराजांचा पोवाडा


राया अंता याच समयाला
याच समयाला
याच समयाला
घेऊन चंद्रावर्ताला

राया अंतानी महाराजांचा चंद्रावर्त आणलेला आहे
ती खुंटीला अडकवलेली समशेर राजांनी घेतली
जिरेटोप माथ्यावर चढवला
आणि राजे चंद्रावर्तावर स्वार झालेले आहेत
संताजी आणि बहेरजी…
आलेल्या खानाच्या फौजेशी सामना करू लागलेले आहेत.
महलोजीबाबा… भोवती, पोत आपल्या अंगाभोवती फिरवतो, गरगरा पट्टा फिरवायला लागलेला आहेत

महलोजी याच समयाला
याच समयाला याच समयाला
बोलले राजाला बोलले राजाला

धनी!
चंद्रावताचा लगाम खेचा
नावडी नदी जवळ करा
धनी भांगा काढा
धनी भांगा काढा

गरगरा फिरवीत पट्ट्याला
फिरवीत पट्ट्याला फिरवीत पट्ट्याला
महलोजी याच समयाला
जणू शेलारमामा भासे सर्वाला

साठी ओलांडलेले महलोजी बाबा जगदंबेचा पोत फिरावा याप्रमाणे…
सपासप तलवार फिरायला लागलेली आहे
जीवाची बाजी करून हिंदवी स्वराज्याच्या दौलतीची जपणूक करत आहेत
बहेरजी आणि संताजी हे मोघलांच्या फौजेशी टक्कर देऊ लागलेले आहेत

राया अन्ता होते जोडीला
राया अन्ता होते जोडीला
न् शाहीर कलेश होता संगतीला

शाहीर कलेश हाही हातामध्ये समशेर घेऊन लढायला लागलेला आहे
ही लढाई चाललेली आहे
या लढाईला आता चार तास झालेले आहेत
सरदेसायांच्या वाड्यापासून ही लढाई नावडीपर्यंत येऊन पोचलेली आहे
काही मराठे त्या नावडीमध्ये नौका घालून आपल्या राजाची वाट बघत आहेत
महलोजी सावलीसारखे धन्याच्या पाठीमागे आपली समशेर फिरवायला लागलेले आहेत
कोण कुणाला कापतो आणि कोण कुठे चाललेला आहे
मात्र हे डोळ्यात वात घालून आपल्या धन्याच्या पाठीमागे आहेत

धनी!
भांगा काढा धनी भांगा काढा
नावडी जवळ करा
धनी भांगा काढा

घामेघूम झालेला महलोजी पुन्हापुन्हा आपल्या धन्याची राखण करतो
इकलास मुखरबच्या लक्षात आलं
आणि इकलास मुखरबनं विचार केला
हे म्हातारं अडवल्याशिवाय आपल्याला संभाजीला घेरता येणार नाय

घेऽऽर डालो बुढ्ढे को ऽऽऽ!

इकलासचा आवाज कानावर येताच महलोजीबाबांच्या बाजूनं मोघली नंग्या तलवारी चमकू लागल्या
शंभूराजापासून महलोजीला बाजूला नेण्यात आलं !
हाताचे पट्टे झडत होते
साठी ओलांडून गेलेला म्हातारा…
किती वेळ पट्टा फिरणार
साडेचार तास हे हात चालू होते

आणि महलोजीला…. बाण लागला…

महलोजीला बाण लागताच महलोजी घोड्यावरनं कोसळले गेले…..

राजांच्या कानावर शब्द आले,
राजे! महलोजी बाबा गेले!

एक क्षणासाठी राजांची तलवार थांबली गेली
राजांचं लक्ष पाठीमागं जाताच राजावर समशेरीचा वार करण्यात आला
राजांनी मान झुकवली
पण राजांच्या जिरेटोपाला ती तलवार लागली
अन् राजांचा जिरेटोप जमिनीवर कोसळला गेला
अपशकून होता
युद्धामध्ये शीरस्राण जमिनीवर पडायला नको होतं!

शंभूराजांचं मन चरकलं गेलं…

शंभूराजांचं मन चरकलं गेलं!

आणि शंभूराजे काय म्हणत आहेत…

संताजीऽऽऽ.
तुम्ही इथून भांगा काढा!
रायगड गाठा!
जीवाची बाजी लावा!
रायगडाला लढवा!
आमचं काही होवो..

संताजी घोरपडे आपल्या हातातली समशेर फिरवीत होते.
शत्रूच्या तावडीत धन्याला सोडून आम्ही रायगडाकडे जावं हे संताजीला मान्य नव्हतं
पुन्हा राजांनी आवाज दिला-
संताजी!
बहेरजी!
रायगडाला वाचवा!
जीवाची बाजी लावा!
आमचं काही होवो!
हा हुकूम संभाजीचा आहे !!!

संताजीनं मुजरा केला आणि संताजीनं निघायचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे
महाराजांचे पुन्हा पट्टे फिरत आहेत
आता मात्र दिसायला लागलेलं आहे
त्या नावडी नदीच्या काठाच्या माळावर रणकंदन चाललेलं आहे
एवढ्यात नेमबाजानी बाण मारला आन् तो बाण शाहिराच्या उजव्या दंडात येऊन घुसला
शाहीर घोड्यावरनं पडत म्हणताय

मै गिर गया हूं
मै गिर गया हूं

शंभूराजानं पाहिलं शाहीर कलोश घोड्यावरनं खाली कोसळलेला आहे
राजानं उडी टाकली!

कुशीत धरलं शाहिराला

शंभूराजांनी.. चंद्रावताहून उडी खाली मारली
शाहीर कलोशला पोटाशी धरलं
शाहीर कलोशने आपल्या दंडातला बाण केव्हाच फेकून दिला होता

पण एवढ्यात काय झालं
आता हे रणकंदन सुरू झालं होतं, आता ही लढाई सुरू झाली होती, जमिनीवली!
कुणीही घोड्यावर नव्हतं
माणसाला चालता येत नाय अशी शंभूराजाच्या बाजूनं गर्दी झालेली आहे
चारी बाजूनं नंग्या तलवारी आणि भाले आले
आणि शंभूराजाच्या देहाला भाले येऊन टोचले गेले
मुखरबचा तरणाबांड पोर्‍या इकलास शंभूराजांच्या जवळ आला
सप्तनद्या आणि सागराने ज्या राजाला अभिषेक झाला होता, त्या राजाच्या जटा हातात धरल्या आणि काय म्हणत आहे-

हत्यार छोडो!
हत्यार छोड दो!

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका: बाबासाहेब देशमुख
संगीतकार: बाबासाहेब देशमुख
गीतकार: शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारीत
[/slider]

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.