भय इथले संपत नाही…..ग्रेस


मुळ कवितेचे नाव “निष्पर्ण तरुंची राई” असे असून, ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे. मुळ कवितेत एकुण ७ कडवे आहेत (ध्रुवपद वगळता).

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई

– चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

2 thoughts on “भय इथले संपत नाही…..ग्रेस

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.