इशारे


पुरेत हे बोलके इशारे नकोच बोलू
उगाच जळतील लोक सारे नकोच बोलू

नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला
नजरचुकीने नको कुणाला कळावयाला
कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू
नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू

अधर विलगता टपोर मोती कलंडताना
तुझे शब्द सूर्य होउनी तेज सांडताना
नभात ढळतील चंद्र तारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर वारे नकोच बोलू

चराचरालासुध्दा नसावा तुझा सुगावा
असा हळूवार देह अलगद मिठीत यावा
‘ अता तरी बोलशील का रे ?’ नकोच बोलू
स्पर्शांमधुनी बोलू सारे नकोच बोलू

– वैभव जोशी

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

2 thoughts on “इशारे

  1. प्रेयशीच्या एकांत मिल्नातल्या गुज्गोस्ठी ! कोणीही पाहू नये कोणीही ऐकू नये असे वाटणारे मिलन ! खरोखरच अप्रतिम कविता !

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.