उठा उठा चिऊताई


उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

– कुसुमाग्रज

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.