माती


माती ..भुसभूशीत
लुसलुशीत पण अबोल माती..
कोणत्यातरी साच्यात
स्वतःला बसवू पाहणारी माती..
साचे निराळे.. कधी पुरूषी तर कधी स्त्रित्व दाखवणारे.. Continue reading

Advertisements

तूही ये असाच…. कधीतरी


तूही ये असाच..कधीतरी…
तू पाठवलेला वारा,
काल कानात गुंजी घालून,
मानेखाली गूदगूल्या करून,
अलगद निघून गेला..
निरोप न घेता…
ए, एकदा तूही ये असाच..

बघ ना ! तो वरचा ढग,
कसं आभाळ व्यापून राहीलाय..
जसं..तू व्यापलंस माझं आभाळ..
एकटाच आला आणि..
गूपचूप बरसून गेला माझ्या अंगणात..
ए, एकदा तूही ये असाच…कधीतरी..

कधीतरी माझ्या खिडकीजवळचा पडदा..
वा-याने फ़ार उडत असतो..
जवळ असले मी की,
मुद्दाम फ़िरतो माझ्या ओठांवर..
ए..तूही फ़िरून बघ ..
एकदा असाच..कधीतरी….

खळाळती नदी बन कधीतरी..
वाहून बघ..
आत बाहेर माझ्यातून…
भिजव मला.. आणि
चिंब हो तूही…
बघ.. ये एकदा असाच….
निरोप न देता..
आगंतूकासारखा….

पण ये.. ये ..कधीतरी..

– हर्षदा

रात्र..


तू अशीच पसरवत जात होतीस,

स्वतःला..माझ्या रोमारोमावर…
तूझी काळी छाया झाकाळत होती,
माझं मन.. माझ्याही नकळत..

शेजारी निद्राधीन असलेल्या
माझ्या मालकालाही आलीस ओलांडून..
त्याला कशी जाणवली नाही,
तूझी अनामिक.. भयंकर चाहूल??

पण मी भेदरले होते..
मी खरंच भेदरलेच होते..

शिरले त्याचे कूशीत..
त्याचे प्रचंड बाहू आवळून घेतले..
स्वतःभोवती…. !!
रूतवून टाकला माझा चेहरा..
त्याच्या छातीवर !!
…पण.. पण..सारं व्यर्थ !!

माझ्या धडधडणा-या छातीतून,
… भिजलेल्या अंगातून,
कपाळावरून ओघळणा-या घामातून,
थरथरणा-या देहातून,
नजरही वर उचलता येत नाही..
इतक्या घाबरलेल्या माझ्या मनातून..

जाणवत राहीलीस तू….
अजून अजून घाबरवत राहीलीस..

आणि मी घाबरत राहीले तूला..
त्याच्या कूशीत असतानाही..
कारण..
तो असूनही एकटी होते मी..
आणि तू सोबतीला..
एकटेपणाची जाणीव करून द्यायला…

– हर्षदा

तू हसतोस.. बाबासाठी..


तू हसतोस.. बाबासाठी..
बाबा, तू नेहमीच का रे असा..
ओठ लांबवून हसतोस??
अलगद हसताना..
पापण्या तेवढ्या झूकवतोस खाली..
कूणाला डोळे दिसू नयेत,
म्हणून की काय??

बाबा…
आपली आई गेली ना..
तेव्हा तू कोप-यात बसलेलास..
मला फ़ार मज्जा येत होती रे..
इतकी सगळी माणसं बघून..
..
आपल्याकडे पार्टीला यायचे..
तेच सगळे होते ना तेव्हापण??

तेव्हा, मला येणारी मजा बघून..
मला पोटाशी घेऊन ..
तू असाच हसला होतास..
न जाणे, तेव्हा मात्र..
तूझ्या बंद पापण्यांतूनसूद्धा..
एक थेंब खाली ओझरलाच…
मला आपलं कळलंच नाही..
तूझे माझ्या डोक्यावरले हात..
असे का थरथरतायत??
….
बाबा.. तूझ्या या हसण्यावरंच..
………मोठी झालेय रे मी !!

आजकाल,
मी फ़ार गोंधळ करते ना रे??
रोजच्याच खूरापती घेऊन येते..
..
चार भिंतींच्या पलीकडे मोकाट सूटते..
..
“मग धक्का मारतंच रे कूणीतरी”..
आणी मी चिडते…
पेटते.. आणि भिडते, नाक चढवून…

घरी आले की मात्र..
तूझ्या “थोड्या सूटलेल्या” पोटाला बिलगते..
तू मायेने हात फ़िरवून ..
तसाच हसतोस किंचित…
पण आजकाल पापण्या मिटत नाहीस..

मूद्दामंच दारं मोकळी सोडतोस..
तूझ्या मनाची

काळजी असते रे त्या डोळ्यांत..
“तू काळजी करतोस ना माझी?”

जाणूनबूजून मनाची कवाडं उघडतोस..
मी सावरावं म्हणून…

तसाच गालातल्या गालात हसत….
एका हाताने वेगळी करतोस मला..
तूझ्या शरीरापासून..

आता मी ‘स्वतः’ उडायला हवंय..
हेच सांगतोस ना?? मला लांब करून…
तसाच हसत..
गालातल्या गालात..
ओठ लांबवून..
पण पापण्या न लवता…

– हर्षदा

८ जाने. ०९, १७.००