असेन मी रे जवळच


तुला वाटले ‘दूर किती मी झालो ‘, पण मी तिथेच आहे
तुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहे

हसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आले
समज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे.

जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जर
झाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहे

तुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईन
खुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहे

तुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईल
मला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहे

दर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावर
गळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहे

प्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होते
स्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहे

तुला वाटले ‘दूर किती मी झालो ‘, पण मी तिथेच आहे
विसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे

गीत : स्वरांगी देव

Advertisements

भुल


सोडुनी गेलास ना तू शेवटी ?
राहिले रानात मी ही एकटी
पाहिल्या अलवार नयनी भावना
अर्थ आला कोरड्या या जीवना
भेटला आधार बळकट संकटी
….राहिले रानात मी ही एकटी
स्पर्श तो उबदार होता लाघवी
बाहुपाशांतून स्वप्ने रंगवी
मन बने सार्‍या सुखांची राहुटी
…राहिले रानात मी ही एकटी
गोड बोलुन भुलवले रे तू मला
शब्द सारा रे खरा तो वाटला
भूल पडली या मनावर चोरटी
…राहिले रानात मी ही एकटी
गीत : स्वरांगी देव

चुटपुट


राग : अहीर भैरवताल : अद्धा
चाल साधारण : “इक पल जैसे एक जुग बीता” …पुछो ना कैसे मैने…रैन बीताई या गाण्यातली ओळ…

चुटपुट

दिसला नव्हता जीव जडलेला
पण भरलेले डोळे दिसले
गांव सोडुनी निघता निघता
वेशीवर पाऊल अडखळले

डोळ्याला भिडला कधी डोळा
चटकन दुसरीकडेच बघणे
रेंगाळत वाटेवर असणे
समोर येता गुमसुम होणे
….समोर येता गुमसुम होणे
वागण्यातुनी दिसले नाही
शब्दही ओठांमागे खिळले
गांव सोडुनी निघता निघता
वेशीवर पाऊल अडखळले

रुमाल माझे हातोहाती
तेव्हा कसे हरवले होते
वहीचा माझ्या सुवास घेता
त्याला कुणी चिडवले होते
….त्याला कुणी चिडवले होते
तरल मंद नाजुकशी प्रिती
जाणवता मोहर दरवळले
गांव सोडुनी निघता निघता
वेशीवर पाऊल अडखळले

दूर कुठे तो गांव राहिला
नाही कसला धागा उरला
निरोप देताना वेड्याने
असा निखारा मनी पेरला
….असा निखारा मनी पेरला
अंतर इतके, अंतर माझे
झुरले, चुटपुटले, हळहळले
गांव सोडुनी निघता निघता
वेशीवर पाऊल अडखळले
वेशीवर पाऊल अडखळले
…..

गीत : स्वरांगी देव
संगीत : स्वरांगी देव

मिता तुझ्या रे मीठीत


मिता तुझ्या रे मीठीत
जीव चोळामोळा होतो
तुझ्यावीण माझ्या मीता
दिस सरेनासा होतो Continue reading