आता रुतते कविता


आता सरलाच खेळ
आणि सरलेले सारे
फक्त जखमा झेलीत
मागे उरते कविता ..

तेव्हां जातांनाही सखे
तुझे पाऊल थांबले
“नको थांबुस साजणे”
असे म्हणते कविता ..

बांध फुटणार आता
अश्रु भरती कधीचे
आणि डोळ्यांच्या समोर
दूर निघते कविता ..

एका फुलाची पाकळी
फक्त उरली हाताशी
बाकी सारे सारे फुल
तुला अर्पिते कविता ..

तुझ्या भाळावर एक रेघ
कुंकवाची आज
माझ्या मनगटी रक्तरेघ
बनते कविता ..

तुळशीची दोन पाने
तुझ्या मेंदीमधे आली
माझ्या ओठांची तुळस
आज बनते कविता ..

पाकळ्यांचे जरी झाले
तुझ्या पायघडी रान
फक्त काटाच बनुन
आता रुतते कविता ..

फक्त काटाच बनुन
आता रुतते कविता ..

ओली पापणी वाहते
संगे रडते कविता
सारे सरलेले खेळ
असे सांगते कविता
.
वाट मेंदीची बघणे
आता सरले कधीचे
मनगटी रक्तरेघ
अशी ओढते कविता
.
काळजाला वार झाले
पण हुंदका फुटेना
रोंधलेले शब्द माझे
आता वेचते कविता
.
चिता पेटली स्वप्नांची
त्याला सप्तपदी घाल
अक्षतांचे झाले बाण
आता रुतते कविता
.
आता रुतते कविता !!!!

कधी घायाळ कविता
आणि जिव्हारी मनाला
त्यात सल बनुनिया
अशी सलते कविता
.
नाही जाणार म्हणुन
तीही गेलीच निघुन
तिच्या पावलांचे ठसे
नित्य जपते कविता
.
कधी गरसतो ढग
आणि पडतो पाऊस
पावसाच्या जखमांनी
रोज कण्हते कविता
.

संतोष (कवितेतला)

Advertisements

खिडकीत


खिडकीत .. बुडणारा सुर्य, किरणांचे आवेग
क्षितीजाला केशराची, हेलकावते रेघ ..

रात्रीचा आरंभ, काळोखाचा गाज
रातकिड्यांची किरकिर, गुढ आवाज ..

संपणारा दिवस, चोरुन बुडतो
उद्या भेटुयात, हलकेच म्हणतो ..

चंद्राची कोर, तारकांची पोर
चंदेरी परकर, खेळाला जोर ..

खिडकीत …

जवळच जग, दुरचे भास
गेलीस तु .. उरले निःश्वास ..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

//

जमाना गेला..


आताशा मी हिरवळ झालो, पाऊस निघुनी जमाना गेला..
आताशा मज सुचली कविता, अर्थ निघुनी जमाना गेला..

उसने भरले शरद चांदणे, उसनी सजली रात अंबरी
आताशा नभ सजता सजता, रात्र निघुनी जमाना गेला..

ति आली तैशी गेली, पुन्हा आली पुन्हा गेली
अताशा मी अश्रु झालो, हसु निघुनी जमाना गेला..

अंदाज सारे चुकले माझे, तोलही चुकला सावरतांना..
अताशा मी सावरतांना, जखमा भरुनी जमाना गेला..

दुष्ट कितीसा होतो मी, अन्‌ वेळ किती ति होती खोटी
अताशा मी वळलो मागे, तुलाच निघुनी जमाना गेला..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

फार वाईट झालय आयुष्य ..


तीन प्रहर झाले अजुन पत्ता नाही श्वासांचा
दिवसभर कुठे जातात कुणास ठाऊक ?
आणी जेव्हा ऑफीसवरुन परत घरी परततो
तेव्हां रुसुन कुठेतरी जाऊन बसतात
फार वाईट झालय आयुष्य
श्वासांना भेटण्याची देखील उसंत नाही
पण एक प्रश्न भेडसावुन सोडतो नेहमीच
मी दिवसभर जगतोच कसा ?
ऑफीसमधल्या फाईल्स हुंगत ?
की मशीनची कडु कॉफी गिळत ?
खरंच, फार वाईट झालय आयुष्य ..
श्वास घ्यायला देखील फुरसत मिळु नये ??
– संतोष (ऑफीसमधला)

येशील तुही केव्हांतरी…


वाट बघणे सरले जरी
आठवण जुनी आहेच खरी
सख्या तुझीच चाहूल होती
येशील तुही केव्हांतरी…

संपेल रात्र अंधाराची
पसरेल मात्रा ताऱ्यांची
वाटच संपत आलीये जरी
येशील तुही केव्हांतरी…

आतुन काही सलतंय आज
चंद्रालाही कसला माज ?
हसेन माझ्यावर दुनिया जरी
येशील तुही केव्हांतरी…

ठार वेडी म्हणतात सारे
पावसासकट हसतात वारे
किती साहू गार सरी ?
येशील तुही केव्हांतरी…

– संतोष (कवितेतला) ९८८११५८८४५

पहिला स्पर्श .. (First Kiss)


नजर झुकली आणी ती जवळ आली
दोघांत अंतर अता फक्त एका श्वासाच राहीलं होतं
तोही श्वास काही क्षणांनंतर
अंतरे मिटवुन गेला
मग मागे राहीले ओठांवर ओठांचे
काही मंजुळ स्वर
एक अनामीक स्पर्श, आणी निस्सीम प्रेम
तिने एकाच स्पर्शात तिच्या मनाच सार गुज सांगुन टाकलं
ते पहिली भेट ओठांची
किती अविस्मरणीय होऊन गेली
तिने डोळे उघडले, तेव्हां
ते पाण्याने डबडबले होते
पण तिच्या ओठांवर होत एक कोवळं हसु
आणी माझ्या मनातली कविता
मग ती अगदी खोल मिठीत शिरली
अगदी काळजापर्यंत

आता माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं
आणी
ओठांवर होती तिची कविता..
खरंच.. किती जादु असते त्या पहिल्या स्पर्शात ?
एक अनामीक जादु..

– संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३

FOR MORE –
http://marathikavitaa.blogspot.com/

आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत..


ऑफीसवरुन घरी निघायची वेळ
सगळेच अगदी घाईला टेकलेले, आणी
अचानक पाऊस बरसु लागला
त्याचे दिवसच आहेत म्हणजे तो बरसणारच..
पण असा अचानक ??
इतक्यात “ती” दिसली
आणी वीज कडाडली, त्या क्षणभाराच्या प्रकाशात जणु परीच भासली
पाऊस तिच्या गालांवर अगदी थैमान घालत होता
ती मात्र त्याला साधा विरोधही करु शकत नव्हती
क्षणभर माझाही जळफळाट झाला..
तिने माझ्याकडे पाहिलं..
आणी पुन्हा एक वीज कडाडली
पण आभाळात नाही, हॄदयात..
ती जवळ आली
मी छत्रीत होतो, पण काय करु सुचेना..
एक मन म्हणतयं, तिला छत्रीत घ्यावं..
आणी दुसर ओरडतयं, तिच्या सोबत भिजावं..
“ती” मात्र असाच एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अजुन भिजतेच आहे..
अखेरी वाराच पडला मधे..
आणी माझ्या हातची छत्री हिसकावुन घेऊन गेला..
आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत..
ती पावसात आणी मी तिच्या भिजणाऱ्या रुपात ..

संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३