जगण्यात मौज आहे


Advertisements

स्पायकर…ती..आणि मानसिक द्वंद्व..!


“स्पायकर’च्या शोरूमवर तिने तिरकी नजर टाकली..
हुश्श..अजून तिकडेच आहे..
डिसप्ले विंडोमध्ये त्या टकल्या पुतळ्यावर लावलेले बाह्या वर दुमडण्यासाठी स्ट्राईप्स असलेले जांभळे शर्ट तिला मनापासून आवडले होते..
कामावरून येताना रोज शोरूमवर नजर टाकायची आणि शर्ट गेलेलं नाहीये हे पाहिलं की साई सुट्ट्यो!
गेले तीन दिवस तिचा हाच खेळ अव्याहत सुरु होता..
आज मात्र काही करून शर्ट घ्यायचेच अशा निश्चयाने ती आत शिरली..
११६०??
अर्र्र…
एखाद्या शर्टची किंमत एवढी का असावी??ती पण नेमकी मला आवडलेल्या शर्टाची???
ती प्रचंड हिरमुसली…
११६० चं एक शर्ट तर ११६० मध्ये कुर्ता-सलवार-स्ट्रोल ‘मिक्स ऍंड मॅच’ चे सेटस किती???..’ज्ञानोत्सव’मध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरलेय…किती पुस्तके येतील..??
ताबडतोब डोक्यात त्रैराशिक मांडलं गेलं..
अतिशय अनिच्छेने शर्ट परत काऊंटरवर ठेवून ती दुकानाच्या बाहेर आली..
मोठ्ठा श्वास घेऊन ती घराच्या दिशेने चालायला लागली..
पाच आकडी पगार घेणारया तिला खरं ते शर्ट विकत घेणं अशक्य नव्हतंच मुळी..
यावेळी तिच्या वॉलेटमध्ये २ हजाराच्याही वर कॅश होती..
मग..??
ती एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलगी होती..
एकाच वस्तूवर एकाच वेळी हजार रुपये उधळणे तिला कधीच जमले नव्हतं..
तिला ते कधी शिकवलं गेलेलंच नव्हतं…
आई-वडीलांनी काडी-काडी जोडून उभा केलेला संसार तिने पाहिला होता..
पै-पै जोडून आईने तिला शिकवलेले तिने पाहिले होते..
आणि हजार काय थोडीथोडकी रक्कम आहे???
हजारचे फ़क्त ‘एक’ कॅजुअल शर्ट???नाही..घेतले नाही हे बरोबरच केले मी..कॅजुअल्स मी फ़क्त वीक-एन्डसना घालणार..ते पण कधी कधीच…आणि घरी राशीवारी सुंदर कुर्ताज,जीन्स,सुंदर सुंदर ऍक्सेसरीज पडलेल्या असताना मला काय गरज आणखी एका कॅजुअल शर्टची??
गरज नसेल तर उधळपट्टी करू नये…हे तिच्या मनावर बिंबलं होतं…आणि तिला पटतही होतं…
पण..
काय होईल मी फ़क्त याच वेळी ‘फ़क्त आवडलं म्हणून’ ते शर्ट विकत घेतलं तर???
अशक्य नाही आपल्याला ते…
च्यायला..किती वेळ ह्या मिडलक्लास मेंटॅलिटीने आपल्या ईच्छा मारत राहणार??
‘सातच्या आत घरात’ मधलं "तुमच्या इनर्स जितक्या किंमतीला असतात ना..त्यात आम्हाला एक ड्रेस बसवावा लागतो…ओढणीसकट" हा डायलॉग ऐकून एकेकाळी तिला भडभडून आले होतं..
पण..
आता परिस्थिती वेगळी आहे…
पांढरपेशा वर्गात मोडणारे आपण अजूनही ..एक काय ते कॅज्युअल शर्ट घेताना विचार करतो?
नेहमीच असं होतं…आपल्याला आवडणारी गोष्ट खूप महाग म्हणून घ्यायचं टाळलं आपण..
च्यायला आपल्या आवडी-निवडीपण नेमक्या जहागिरदारासारख्या..
पण यावेळी नाही..
शर्ट घ्यायचा निर्णय पक्का झाल्यावरही रात्रभर तिला पूर्वी कोणत्या ईच्छा मारल्या हेच पुन्हा पुन्हा आठवत राहिले..
साऊथ-एक्स्पोमध्ये आवडलेली २५००ची हस्तिदंती पेटी…आपल्याकडे चांदीची पेटी ऑलरेडी आहे म्हणून घेतली नाही..
पण त्या २५०० मध्ये आपण जर्मनचा कोर्स केला..
रॅडोचे घडयाळ आवडले होते..पाच हजाराचे..ती आवड ९००च्या सायझरवर परतवली…आणि २५००चे सुंदर सुंदर कुर्ता सेटस शिवले जे अजूनही सगळ्यांच्या असूयेचा विषय आहेत..
असू देत…
कमी किंमतीत जास्त युटीलिटी…मोटो जरा बाजूला ठेवूयात आपण..
काय करावं???
काहीतरी मनाशी ठरवून ती शांत झोपून गेली…
दुसरया दिवशी स्पायकरच्या पायरया चढताना तिच्या चेहरयावर आदल्या रात्रीच्या द्वंद्वाचा जरही लवलेश नव्हता..
काऊंटरवर विचारणा केली तर काऊंटरपलीकडून उत्तर आले…
"ईट गॉट सोल्ड..मॅम.."
"ओह…इट्स ऑलराईट.."
बाहेर पडल्यावर ती जराशी हसली…ती ऍक्चुअली आनंदली होती..
जो होता है ऑलवेज अच्छे के लिये होता है…
तिला मोकळंढाकळं वाटलं…
शर्ट घेतलं असतं आपण तरी आठवडाभर नुसती टोचणी लागून राहिली असती…
हे खूप बराय…
या हजार रुपयात खूप सारी पुस्तकं घ्यायची ठरवून ती आनंदाने घरची वाट चालू लागली..
 
-श्रद्धा भोवड http://shabd-pat.blogspot.com/

कोणासाठी?…


उफाणलेला अथांग सागर
वाजत गाजत अखंड गातो
निळे सावळे गीत गातो
कुणासाठी….माझ्यासाठी

माझ्या स्वप्नांचे मार्दव
रात्री पाकळयांतून उलगडते
रातराणी मग धुंदीत गाते
दिवाणे नवथर गाणे …माझ्यासाठी

इंद्रधनुचे सप्तरंग झळाळते
सदाफुलीचे सदाचेच लाघव
सुंदरतेचे दान हे फक्त ..
माझ्यासाठी माझ्यासाठी

अचानक एक सावळा मेघ
माझ्यावरती बरसुन गेला
वीज नजरेला भिडवून गेला
म्हणत…फक्त तुझ्यासाठी

त्याच्या वेडया प्रपातामध्ये
शब्द माझे भिजून गेले
मौनातून बहरले मग
नवथर गाणे …कोणासाठी?

लावावं स्वत्व फिरून पणाला
सर्वस्व ज्यावर द्यावं उधळून
कोणासाठी होई ‘माझे’पण परके?
त्याच्यासाठी …मनमीतासाठी

– श्रद्धा भोवड

ती


आहेच ती वेगळी जराशी
हसणं मस्करी सखे सांगाती
हवीत तिला माणसे सभोवती
हरक्षणी जोडू पाही नवी नाती

जसे मित्र अगणित ….तसे शत्रुही
कधी कौतुक कधी कुतुहल
कुत्सित शेरेबाजी कधीमधी
ओठ हसरे तरी पचवून हलाहल

या झगमगत्या वलयामागे
एकांती तीच ..जग तिच्याशिवायचे
पळू पाही पण पाठी
ओढणारे धागे काळॉखाचे

वेडे गाणे गाती सभोवती
सुखाने भ्रमलेली लोकं
असे असले तरी हिच्या डोळ्यात
ओळख साकळलेला डोह

मुखवट्यामागून मग तिला
काहीच नये दिसू
अद्रुश्याचा हात पुसी
मग गालावरचे आसू

ओळखीच्या पोटातील ही ओळख
वाटेलही कदाचित विलक्षण
जरी भासवलं तिने तुम्हाला
जगली सहा ऋतू क्षण् न् क्षण्

सुख लागेना तिला काही केल्या
झरे ते जशी वाळू कण् न् कण्
धुंडाळून आली सारे राजरस्ते
हाती आले गिळू पाहणारे एकटेपण

ह्या एकटेपणाने जिंकून तिला
मनसोक्त जगूच दिले नाही
म्हणूनच कवितेइतकं ओठ मिटून
तिने दुसरं काही गायलं नाही

– श्रद्धा भोवड