नको नको रे पावसा


नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून? Continue reading

इथे वेदना


इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरताअ संगमरवरी;
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन येथे काळी.

दुखणे बसले चिंध्या फाडित.
गर गर फिरती त्याचे डोळे
नसांनसातुन.
घुमते त्याचे हास्य भयानक
उरल्या सुरल्या रक्त कणांतुन
समोर त्याच्या
करते नर्तन …..एक आठवण
त्या प्रलयाची.
हे कथ्थक…त्या मुद्रा…..
अन ते खर्जातले कंपन.

– इंदिरा संत

किती दिवस मी


किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…

किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.

चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन

– इंदिरा संत

निळा पारवा


वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.

डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.

-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.

जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.

पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे–\
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…

तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.

पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.

– इंदिरा संत

ऋणमुक्त


सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.

कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..

– रंगबावरी, इंदिरा संत

थेंबाथेंबी


तारेवरती असती थांबुन
थेंब दवाचे;
मनांत ज्यांच्या,
इवले काही, हिरवे पिवळे
चमचमणारे……
सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनांत ज्यांच्या ,
इवले कांही, निळे- जांभळे
झनझनणारे…….
मनोमनावर असती थांबुन
थेंब विजेचे;
छेडुन तारा करांगुलीने.
ऒठ करावे पुढती
टिपायला ती थेंबाथेंबी.

– इंदिरा संत

तुला विसरण्यासाठी


तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!

– इंदिरा संत