दु:ख ना आनंदही


दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा. Continue reading

Advertisements

सप्रेम द्या निरोप


तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
“सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे”

– आरती प्रभू

जाईन दूर गावा


तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

– आरती प्रभू

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी


तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)

आसवांचा येतो वास


कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

गीतकार :आरती प्रभू
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

तुम्ही रे दोन, दोनच माणसंतुम्ही रे दोन, दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
एक धाकुला, मनाचा किती किती मऊ सांग
तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला
त्यांत सुद्धा मधाचा झरा गोडगोड
माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी

एक लहानगा मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी, कितीतरी माया त्याची
बापासारखा आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहूनी सख्खी दोन
हा उभा गाव अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी

गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :चानी

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीतनाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर.

जर ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर comment नक्की टाका आणि नवीन update साठी या ब्लॉगचे सभासद व्हा !